वर्ष ऋतचर्ष
वर्षा ऋतु, पावसाळा म्हटलं कि मला मिलिंद इंगळेची ती कविता आठवते , “त्याला पाऊस आवडतो , तिला पाऊस आवडत नाही, पाऊस म्हणजे चिखल सारा , पाऊस म्हणजे मस्त हिरवळ ……. ” . खरंच काहीना पावसाळा खूप आवडतो तर काहींना अजिबात नाही, कारणे अनेक. पण अनेकांना पावसाळा आवडत नसेल ते पावसाळ्यात होणाऱ्या निरनिराळ्या आजारांमुळे. आरोग्याच्या दृष्टीने पावसाळा खूप नाजुक ऋतु आहे. पावसाळ्यात हवेत आर्द्रता व गारवा असतो, जे आरोग्यासाठी योग्य नसते, पाणी दुषित असते, पावसामुळे मनुष्याचे अग्निबळ (पचन व जरण शक्ती ) मंदावलेले असते, आधीच्या उन्हाळ्या मुळे शारीरिक शक्ती आधीच कमी झालेली असते. म्हणजे शरीराची व अग्नीची शक्ती कमी आणि दुषित वायू आणि जल , मग काय ! जीव जंतू त्याचा फायदा घेणार हे निश्चित. आणि म्हणून पावसाळ्यात आजारांचे प्रमाण जास्त असते.
पावसाळ्यात वात दोषाचा प्रकोप होतो आणि त्याला कफ व पित्ताचीही साथ मिळते, विशेष करून कफाची. जेव्हा वाताला कफाची साथ मिळते तेव्हा सर्दी , पडसे, दमा, संधिवात, भूक मंदावणे, उलट्या होणे, त्वचा विकार आदि विकार उद्भवतात आणि जेव्हा पित्ताची साथ मिळते तेव्हा, अतिसार, ताप, आम्लपित्त सारखे विकार होतात. दुषित पाण्यामुळे टायफोइड, कावीळ सारखे आजार होतात.
पण ऋतू बदलणारच, हवामान पालटणार, शरीरात बदल होणार, हे सगळ चालायचं, पण आपण या सगळ्या परिस्थितीत आरोग्याने सक्षम असू तर आपले कर्म आपण नित्याने व्यवस्थित करू शकू, त्यासाठी ऋतूप्रमाणे आपणही काही बदल आपल्या जीवनशैलीत, खाण्यापिण्याच्या सवयीत करणे आवश्यक असते , त्यामुळे ऋतु बदलाचे होणारे परिणाम आपले शरीर व्यवस्थित पेलू शकते. नाहीतर ऋतू काहीही असो आपले १२ महिने खाणे पिणे तेच, मग गोष्टी नक्कीच बिघडतात.
आता विस्तृत पणे वर्षा ऋतू चर्येची माहिती घेऊ , आहार, विहार, औषध व पंचकर्म या क्रमाने.
आहार – काय खावे प्यावे व काय नको याला खूप महत्व आहे आणि तसा योग्य बदल करणे गरजेचे आहे .
काय खावे –
आहार नेहमी गरम गरम घ्यावा,
मूग / मसूर / चवळी यांच्या पासून वेगवेगळी किंवा एकत्रित मिसळून केलेला डोसा किंवा अप्पे, शेवयाचा उपमा, रव्याचा उपमा, खावा, मूग व तांदळाची आसट खिचडी, तूप व लिंबू घालून खावे.
डिंकाचे लाडू, किंवा अहळीवाचे लाडू खावेत.
फळे – मोसंबी, डाळींब, संत्री .
दुधाचे पदार्थ – दुध नेहमी गरम प्यावे, त्यात २ चिमुट हळद किंवा २ चिमुट सुंठ पूड मिसळावे.
भाज्या –
पालेभाज्यांचे सूप प्यावे.
सर्व फळ भाज्या विशेषतः वेली वरच्या भाज्या – दुधी , पडवळ , दोडका, कारले, घोसावळ ई
मुगाचे कढण लिंबू पिळून प्यावे.
भात जुन्या तांदळाचा असावा. ( शक्यतो १ वर्ष जुने ) नवे तांदूळ पचायला जड व कफ वाढविणारे असते. तसे उपलब्ध न झाल्यास तांदूळ आधी तव्यावर थोडे भाजून घ्यावे व मग त्याचा पाणी काढून पातेल्यात भात करावा (कूकर मध्ये करू नये ).
तूप भात खावे.
गव्हाचे पुलके खावेत. (गहू सुद्धा जुने असावेत )
सर्व फळ भाज्या खाव्यात , त्यात बटाटा व वांगी यांचे प्रमाण कमी असावे, घेवडा खावा,
डाळ – मुगाची डाळ नेहमी खावी. तुरीची डाळ व इतर डाळी आठवड्यातून एकदा खावे.
आमटीत थोड्या प्रमाणात चिंच घालावे. (आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्यांनी नको ).
ताकाची कढी प्यावी आठवड्यातून एकदा रात्री.
जेवणात लिंबाची फोड असावी.
उडदाचे किंवा तांदळाचे पापड भाजून खावेत.
पाणी – पाणी शुद्ध तर असावेच (म्हणजे well purified and filtered) पण तरीही पावसाळ्यातील हे पाणी पचायला जड व पोटात वायू उत्पन्न करणारे व ग्यासेस चा त्रास उद्भविणारे असते, म्हणून शुद्ध पाणी उकळून घ्यावे. जेवणा नंतर नेहमी गरम गरम पाणी प्यावे, याने कफ होत नाही व पचन व्यवस्थित होऊन ग्यासेस निघून जातात, शौचाला साफ होते, जेवणा नंतर पोट जड होत नाही व सुस्ती येत नाही. इतर वेळी शक्य झाल्यास कोमट पाणी प्यावे व शक्या नसल्यास उकळून थंड झालेले पाणी प्यावे. पाणी मातीच्या मडक्यात ठेऊ नये.
केरळ मध्ये जिरे घालून पाणी उकळले जाते व तेच पाणी दिवसभर पिले जाते, ते या ऋतूत उत्तम. (२ लिटर पाण्यात उकळताना १ चमचा जिरे टाकावे.)
बऱ्याच जणांना गरम पाण्याची सवय नसते त्यमुळे सुरुवातीला प्यायला नकोसे वाटत असते, पण माझा अनुभव असा आहे कि एकदा सवय झाली कि भर उन्हातून आल्यानंतर सुद्धा गरम पाण्याने तहान भागते.
मांसाहार करणाऱ्यांनी – शक्यतो मांस खाणे टाळावे त्या ऐवजी मटणाचे किंवा चिकनचे सूप प्यावे , ते ज्यास्त तिखट असू नये पण थोडे मसालेदार असावे, त्यात लिंबू पिळावे. अंड्याचा पिवळा भाग खाऊ नये.
१. काय खाऊ पिऊ नये –
शिळे अन्न , पचायला जड , थंड पदार्थ . दही , लोणी, साय, खव्यापासून बनविलेले पदार्थ, खीर, मासे.
मोड आलेली धान्ये , हरभऱ्याच्या डाळी पासून बनविलेले पदार्थ, उदा. पिठलं, वडा, भजी , सामोसा, इ .
पालेभाज्यांचा अतिरेक करू नये, शक्यतो पालेभाज्यांचे सूप करून प्यावे.
बेकारीचे पदार्थ , विशेषतः ब्रेड, केक.
वर सांगितलेल्या व्यतिरिक्त इतर कोणतीही फळे खाऊ नयेत.
कच्ची काकडी, टोम्याटो गाजर, कांदा, बीट , मुळा खाऊ नये, ते खायचे असल्यास सूप बनवून घ्यावे अथवा वाफवून त्यावर मिरे पूड वा मीठ लाऊन खावे.
कोल्ड ड्रिंक्स , आईस क्रीम, फ्रीज मधील पाणी , मातीच्या मडक्यातील पीऊ नये. बरेच जण फ्याड म्हणून पावसाळ्यात कोल्ड ड्रिंक्स पितात. पण ते कोणत्याही दृष्टीने योग्य नव्हे.
२. विहार – (जीवन शैली – लाइफ स्टाईल) :
शक्ती चा आधीच ऱ्हास झाला असल्याने या ऋतूत व्यायाम न करणेच इष्ट . करायचेच असेल तर ते सकाळी लवकर, शौचास साफ झाल्यानंतर २० ते ३० मिनिटे करावे किंवा चालणे , योगासने वा प्राणायाम करणे जास्त योग्य होय.
रोज सकाळी अंघोळी आधी डोक्याला (टाळूला ) खोबरेल तेल लावावे व २-३ मिनिटे मालिश करावे. अंगाला तीळाच्या तेलाने मालीश करावी , किमान संध्याना किंवा गुडघयापासून खाली पायाला तेल लावावे , आयुर्वेदिक स्नान चूर्ण / उटणे अंगाला रगडावे (स्क्रब करावे , विशेष करून पोटाला). अंघोळ गरम पाण्यानेच करावी, थंड पाण्याने करू नये.
सुगंधी अत्तर लावावे . चंदनाचा गंध लावावा. स्त्रियांनी सुगंधी फुले धारण करावी.
पूर्ण कोरडे, इस्त्री केलेले कपडे घालावेत. हवेत गारवा नसल्यास तलम , हलके कपडे घालावेत.
ओल्या जागी बसू नये.
वेळेवर भोजन करावे.
जेवणानंतर १० मिनिटे हळुवार चालावे. बडीसोफ खावे व काहीवेळ डाव्या कुशीवर पडून राहावे.
दुपारी झोपू नये.
उन्हात जाणे टाळावे, जायचेच असल्यास छत्री घेऊन जावे वा डोक्यावर टोपी असावी.
पावसाळ्यात सायंकाळी व्यायाम करू नये.
सायंकाळी शक्य तितके लवकर जेवावे पण भूकेची वाट पहावी. सायंकाळचे भोजन पचण्यास हलके असावे, जड अन्न घेऊ नये. शक्यतो मुगाची खिचडी अथवा वरण भात हेच अन्न असावे.
रात्री झोपायच्या आधी जास्त पाणी पिऊ नये .
३.औषध :
मध – सकाळी उपाशी पोटी १ चमचा मध खावे. त्यावर गरम पाणी पिऊ नये. उकळून थंड केलेले पाणी प्यावे.
दादिमाडी घृत : हे एक औषधी तूप आहे . दुपारी जेवणाचा पाहिलं घास भाताचा घ्यावा त्यात हे तूप एक ते दोन चमचा मिसळावे त्यात लवण भास्कर चूर्ण अर्धा चमचा मिसळावे व खावे, त्यावर एक ते दोन घोट गरम पाणी प्यावे व मग भोजनास प्रारंभ करावा.
दशमूळ रसायन : हे चाटण रात्री झोपताना अर्धा चमचा खावे . याने कफ वाताचे विकार आटोक्यात येतात.
(लहान मुलांनी व ज्यांची पचन शक्ती खूप मंद आहे त्यांनी दशमूळजीराकाद्यारीष्ट हे औषध मधात मिसळून जेवानंतर घ्यावे . याने पचन सुधारते ,गॅसेस होत नाहीत व सर्दी पडसे रोकता येते.)
४. पंचकर्म :
वर्षा ऋतूत वाताला जिंकणे सर्वात महत्वाचे , आणि वातासाठी सर्वात श्रेष्ठ कर्म म्हणजे वस्ती . पण यासाठी कोष्ठ शुद्धी असणे गरजेचे असते. ज्यांनी आधीच्या ऋतूत वमन , विरेचन केले आहे त्यांना कोष्ठ शुद्धीची विशेष आवश्यकता नसते. पण जे पहिल्यांदा पंचकर्म करीत आहेत त्यांनी आधी कोष्ठ शुद्धी करून घेणे इष्ट.
कोष्ठाशुद्धी : यात तीन दिवस एक औषधी तूप भोजनाबरोबर खायला दिले जाते व पचनाला हलका आहार खावयाचा असतो व गरम पाणी प्यायचे असते, त्यानंतर एक दिवस म्हणजे चौथ्या दिवशी सकाळी लवकर मसाज करून वाफ दिली जाते व उपाशीपोटी एक औषध दिले जाते ज्याने ४-६ वेळा जुलाब होतात व कोष्ठ शुद्धी होते. त्यादिवशी सायंकाळी भाताची पेज पिणे व दुसऱ्या दिवशी मुगाची खिचडी व तूप खाणे.
वस्ती : वस्ती म्हणजे सामान्य भाषेत एनिमा देणे. म्हणजे गुदद्वाराने औषधी शरीरात पोहोचविणे.
वस्ती दोन प्रकारचे असतात – स्नेह वस्ती व निरूह वस्ती .
स्नेह वस्ती म्हणजे – औषधी तेलाचा एनेमा देणे. हा एनिमा भोजना नंतर दिला जातो . तेल पोटातच राहते , ते जितके जास्त वेळ पोटात राहते तितके गुणकारी ठरते व ठराविक वेळेनंतर शौचा वाटे बाहेर निघून जाते.
निरूह वस्ती : यात औषधी काढा , मध, तेल औषधी चूर्ण असते . हा एनिमा उपाशीपोटी घ्यायचा असतो. हा एनिमा घेतल्यानंतर १०- १५ मिनिटांत लगेच पोट साफ होते. पूर्णपणे पोट साफ झाल्यानंतर गरम पाण्याने स्नान करावे व मुगाची खिचडी तूप घालून खावी.
स्नेह वस्ती व निरूह वस्ती एक दिवसा आड दिले जातात. म्हणजे आज स्नेह वस्ती दिल्यास उद्या निरूह , परवा पुनः स्नेह….. असे.
वस्ती क्रिया सकाळी ९ ते १२ किंवा सायं ५ ते ७ या वेळेत करावे. गरजे प्रमाणे ८ / १५/ ३० दिवस वस्ती क्रिया केली जाते . पण निरोगी व्यक्तींना सर्वसाधारण पणे ८ वस्ती घेणे गरजेचे असते. वस्ती क्रिया चालू असताना पाणी गरम प्यावे व पथ्याचे पालन व्यवस्थित करावे.
वस्ती मुळे वात दोषावर नियंत्रण प्राप्त होते, व वाताचा शरीरातील संचय थांबविला जातो, जेणेकरून वात शरीरात साठविला जात नाही. कारण हा दर वर्षी हळू हळू वाढत व साठत जाणारा शरीरातील वातच काही वर्षा नंतर विविध विकार उद्भाविण्यास कारणीभूत ठरतो. वस्ती शरीरातील नर्वस सिस्टम व हाडांना बळ देते व त्यांचे कार्य व्यवस्थित होण्यास मदत होते. वस्ती वयस्थापानाचे महत्वाचे कार्य करते, म्हणजे शरीराची आंतरिक झीज होण्याचे थांबविते व म्हातारपण लाम्बविते. वस्तीने उत्साह वाढतो, रोग प्रतिकार शक्ती वाढते.
वाताचे प्रमाण सर्वाधिक असताना त्याचे शरीरातून उच्चाटन करणे गरजेचे असते म्हणून वर्षा ऋतूत वस्ती क्रिया करण्याला इतके महत्व आहे .
वरील सर्व वर्णन अर्थातच सर्वांचा विचार समोर ठेऊन केला गेला आहे. परंतु प्रत्येकाच्या आरोग्याच्या तक्रारी वेगवेगळ्या असतात आणि त्यानुसार यात आवश्यक ते किरकोळ बदल करावे लागतात त्यासाठी एकदा डॉक्टरांशी भेटून चर्चा करून नंतर या सर्व गोष्टी अवलंबाव्यात.
धन्यवाद.
डॉ. अमोल पाटील .
CMO तपस्या हेल्थ अँड वेलनेस
शुभ वर्षा ऋतू.