वेदिक टाइम्स - Tapasya

वेदिक टाइम्स

वेदिक टाइम्स

II  जीवेत् शरदः शतम्  II

जीवेत्  वर्षा  शतम्   किंवा  जीवेत् ग्रीष्म  शतम्  असा आशीर्वाद / शुभेच्छा देताना काय मी आजवर कुणाला पहिले नाही, किंवा तशी प्रथा हि नाही.  जीवेत्शरदः  शतम्  म्हणजे आपण १०० शरद  ऋतु  पहावेत इतके आपले आयुष्य असावे, अशीच शुभेच्छा देतात. यावरूनच शरद  ऋतुचे महात्म्य ओळखावे. म्हणजे शरद  ऋतु पार केला कि इतर  ऋतुत माणूस तरणारच, याची शाश्वती त्यावेळी आपल्या पूर्वजांना असावी शिवाय शारदा सारखा सुखद ऋतु अनुभवायची संधी हि मिळो हा दुसरा उद्देश. वर्षा ऋतु (पावसाळा) सरत आला, कि आपल्या (सामन्यांच्या) दृष्टीने येणारा पुढचा  ऋतु  म्हणजे हिंवाळा. पण आयुर्वेदाने ऋतूंचे निरीक्षण व विवेचन आपल्या पेक्षा थोडे जास्त बारकाईने केले आहे. पावसाळा संपल्यानंतर लगेचच थंडी पडायला सुरु होत नाही, या दोन ऋतु मध्ये निसर्ग थोडा पॉज घेतो, आणि हिंवाळ्या आधी आपणाला आल्हाद दायक असा शरद ऋतु देतो, निसर्ग जणू काही आपल्याला हिंवाळ्याची  तयारी करण्यासाठी अवधीच देत असतो.

निसर्ग वर्ष  ऋतुतून हिंवाळ्याकडे जाण्याच्या मार्गावर असताना आपणाला शरद  ऋतु साधारणतः सप्टेम्बर – ऑक्टोबर महिन्यात अनुभवायला मिळतो. पावसाळा  संपतो आणि उन्हाचे चटके वाढायला सुरुवात होते , आपण याला ऑक्टोबर हीट म्हणतो. आकाश निरभ्र आणि गडद निळे दिसायला सुरु होते. शरदातला आकाशाचा निळसरपणा काही वेगळाच असतो , कधी तरी जरा लक्ष देऊन पहा, ते नेहमी सारखे फिकट निळे नसते, तर अंगठीत घालायच्या त्या निळ्या रत्नाप्रमाणे गडद निळे असते. हवा आल्हाद दायक असते, नद्या भरून वाहत असतात, आणि शरदाचे चांदणे तर वल्ड फेमस. 

या  ऋतुचे  आरोग्याच्या दृष्टीने विशेष महत्व आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने शरद  ऋतुचे वैशिष्ट्य काय , या  ऋतुत आपल्या शरीरात काय बदल होतात, त्यानुसार आपण आपल्या आहार, विहार , सवयीत कोणते बदल करायला हवेत ते आपण आता सविस्तर पाहू. 

शरद  ऋतुमध्ये मनुष्याच्या शरीरातील पित्ताचे प्रमाण सर्वाधिक असते आणि बहुतेक जणांना पित्ताचे विकार बळावतात. आम्लपित्त, मुळव्याध, त्वचा विकार, अपचन, तोंड येणे, पोटात दुखणे, पित्तामुळे डोके दुखणे  यासारखे विकार हमखास डोकं वर काढतात. वर्षातील कोणत्याही इतर  ऋतुपेक्षा पित्ताचे प्रमाण या  ऋतुत निसर्गतःच सर्वाधिक असते, व्यक्तीचे बळ चांगले असेल तर त्याला याचा त्रास जाणवतोच असे नाही, पण पित्त मात्र वाढलेले असतेच. असे पित्त योग्य वेळी, योग्य मार्गाने बाहेर गेल्यास चांगलेच, कारण ते थोडे थोडे साठत राहिल्यास पुढे कालांतराने जीर्ण व्याधी निर्माण करते. म्हणजे, केस पांढरे होणे, केस गाळणे, त्वचेला सुरकुत्या पडणे, चष्मा लागणे, सांधे लालसर होऊन सुजणे. हे त्रास सुद्धा पित्ताने होतात. फक्त डोकं दुखतं, किंवा छातीत जळ जळ होते म्हणजे पित्त नव्हे.  म्हणून जसे पावसाळ्यात धरण भरल्यानंतर धरणाचे पाणी सोडले जाते, तसेच शरद  ऋतुत पित्ताचे प्रमाण सर्वाधिक असतानाच ते शरीरातून बाहेर काढणे महत्वाचे असते, जेणेकरून त्यायोगे शरीरातील मळ, उष्णता व अतिरिक्त चरबी बाहेर पडून जावी.  त्यासाठी दोन महत्वाची पंचकर्मे या  ऋतुत करावयाची असतात. – १. विरेचन  २. रक्तमोक्षण

विरेचन हे पंचकर्मांपैकी एक महत्वाचे कर्म आहे, यात आधी ४ ते ५ दिवस एक प्रकारचे औषधी तूप प्यायला दिले जाते, त्यानंतर ३ दिवस मालिश (मसाज) व सर्वांगाला वाफ दिली जाते व त्यानंतर एक दिवस जुलाबाचे औषध दिले जाते, ज्याने व्यक्तीला १० ते १२ वेळा जुलाब होतात. हे करत असताना खाण्या पिण्याचे पथ्य असते, ते आधीच समजून दिले जाते, पाणी गरम प्यावयाचे असते. ज्यादिवशी जुलाबाचे औषध खायचे असते त्या दिवशी व त्याच्या दुसऱ्या दिवशी २ दिवस सुट्टी घेऊन पूर्ण विश्रांती घ्यावी लागते. इतर दिवशी दैनंदिन कामे करणे शक्य असते. तूप घेण्यासाठी ५ मिनिटांचा वेळ लागतो, सकाळी , ७.३० ते ८ व च्या दरम्यान उपाशीपोटी तूप प्यायचे असते. मसाज व स्टीम साठी सव्वा ते दीड तास वेळ लागतो. औषधी तुपामुळे शरीरातील मळ मऊ होतो. मसाज स्टीम मुळे मळ सुटा होतो व जुलाबा वाटे तो मळ बाहेर काढून टाकला जातो. हि सगळी क्रिया अत्यंत शास्त्रीय असते, ती तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावी, हे नक्की. वर वर हि क्रिया पोट साफ करायची क्रिया वाटते, पण ती संपूर्ण  शरीराला अंतर्भूत करते, केसांपासून शुक्र धातुपर्यंत सर्व शरीरातील मळ, उष्णता व अतिरिक्त पित्त बाहेर काढून टाकण्याचे कार्य हि क्रिया करते. नुसतेच एक दिवशी एरंडेल तेल पिऊन जुलाब करून घेणे व या क्रियेत फरक आहे. ते अनुभवल्या नंतरच कळते. 

विरेचन शरीरातील उष्णता तर कमी करतेच, पण शरीरातला जडपणा, अनुत्साह, आळस, कमी करते, मनाची प्रसन्नता वाढवते, पॉंझीटीवीटी वाढवते, त्वचेला कांती येते, स्त्रियांच्या पाळीचे त्रास कमी करते, लीवर, प्लीहा सारख्या अंतर्गत अवयवांना चालना देते, त्यांना उत्तेजित करते, रक्त शुद्ध करण्यास मदत करते, हार्मोन्स चे कार्य सुधारते. 

विरेचन कर्माने स्त्री पुरुषांची बीज शुद्धी करते, त्यामुळे जन्माला येणारे अपत्य अत्यंत निरोगी, तेजस्वी व अधिक प्रतिकार शक्ती घेऊन जन्माला येते. बीज शुद्धी झाल्यामुळे अनुवांशिक आजार अपत्याला होण्याचे टाळता येते. अपत्य प्राप्तीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या दाम्पत्यासाठी हिंवाळा हा सर्वात योग्य  ऋतु आहे, कारण त्या वेळी, शारीरिक बळ सर्वोत्तम असते व शरीराचे निसर्गतःच पोषण झालेले असते त्यामुळे  उत्तम प्रतीचे शुक्र व स्त्री बीज शरीरात तयार होत असते , व अशा बीजातून उत्पन्न झालेले अपत्य हि तितकेच गुणवान असते. “शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी” . त्यामुळे अशा दाम्पत्यांनी अपत्याप्रप्तीचे प्रयात्नांपूर्वी विरेचन कर्म जरूर करावे. 

विरेचानानंतर ७ ते १५ दिवसांनी रक्तमोक्षण करावे. रक्तमोक्षण म्हणजे शरीरातील रक्त जसे आपण दुसऱ्याला दान करतो, तसेच ते काढणे पण कुणालाही न देता ते काढून टाकणे. याने नवीन रक्त तयार व्हायला उत्तेजना मिळते व रक्तातील दोष बाहेर काढून टाकले जातात. हे करण्या आधी सुद्धा ३ दिवस औषधी तूप खावे लागते, व रक्त काढण्या आधी व्यक्तीस मालिश व वाफ द्यावी लागते. यासाठी विशेष सुट्टी घ्यायची गरज नसते. दैनंदिन काम करता येते. 

आता हि कर्मे तज्ञांच्या सल्ल्याने सर्वांनी शरद  ऋतुत करावे असा सल्ला आयुर्वेद देतो. यासाठी आपणाला काही त्रास असण्याची किंवा होण्यची वाट पहायचे कारण नाही. हे झाले पंचकर्म बद्दल, आता पाहू आहार विहाराबद्दल. –

आहार –


काय खावे –

तांदूळ , मूग, गहू यापासून बनवलेले पदार्थ. 

विशेषतः पडवळ, कारले, दुधी, गाजर, काकडी, तोंडली.

दूध, तूप. 

केळी, चिकू, मोसंबी, डाळींब. 

बदाम, खजूर, अंजीर, मनुके. 

शिरा, उपमा, शेवयाची खीर, भाताची पेज,  मुगाची खिचडी. 

सर्व चवीचे पदार्थ थोडे थोडे खावे, पण गोड, तुरट व कडू पदार्थांचे अधिक्य खाण्या पिण्यात असावे. 

पाणी – शुद्ध पाणी रात्रीच्यावेळी पसरत तोंड असलेल्या मातीच्या मडक्यात अथवा स्टीलच्या भांड्यात भरून त्याच्या तोंडाला धूळ कचरा पडू नये म्हणून पातळ कापड बांधावे, व ते भांडे रात्री टेरेस वर अथवा बाल्कनीत अथवा अंगणात ठेवावे जेणेकरून त्यात चंद्रप्रकाश पडावा. ते पाणी सकाळी पुन्हा कापडाने गळून घ्यावे व तेच दिवसभर प्यावे. या पाण्याला हन्सोदक म्हणतात. हे पाणि पित्ताचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. आयुर्वेदात याला अनन्यसाधारण महत्व आहे. 

काय खाऊ पिऊ नये?

तिखट, खारट, आंबट (आंबवलेले) पदार्थ खाणे सर्वतः टाळावे. 

मद्यपान , लोणचे, पापड, दही, तळलेले पदार्थ .

अतिभोजन (पोट तुडूंब भरून खाणे).

पचायला जड असे मिष्टान्न , चरबीयुक्त मांस. 

शेंगदाणे, कच्चा कांदा, कच्ची मिरची, कच्चे लसूण खाऊ नये. 

लिंबू , टोम्याटो चे प्रमाण या दिवसांत अत्यल्प असावे.

विहार:

सकाळी ब्रह्म मुहूर्तात उठावे (४.३० ते ६ या वेळेत ). 

शौचास साफ झाल्यानंतर मध्यम प्रमाणात व्यायाम करावा, खूप जास्त किंवा खूप कमी व्यायाम करू नये.

सकाळी व्यायामानंतर दुध प्यावे. 

दुपारी १२ ते १.३० या वेळेत भोजन करावे. सकाळी भूक नसली तरी कामासाठी सोयीचे आहे म्हणून सकाळी सकाळी जेवण उरकून घेणाऱ्यांची  संख्या आपल्याकडे जास्त आहे, पण ते योग्य नाही. खरीच तितकी भूक असल्यास हरकत नाही पण भूक नसताना मात्रा सकाळी सकाळी जेवण करू नये. वर नमूद केलेल्या पदार्थांचा नाश्ता करावा. 

दुपारी झोपू नये . मात्र जेवणानंतर शक्य असल्यास विश्रांती घ्यावी (विश्रांती म्हणजे आडवे होऊन पाठीवर किंवा डाव्या कुशीवर पडून राहणे, झोप लागू देऊ नये.) पण शतपावली मात्रा नक्की करावी, जिथे असाल तिथे.

रात्रीचे जेवण ८ वा. च्या आधी उरकावे. 

रात्री चन्द्रकिरणात बसावे , मनाला आधार, सुख व शांती देतील अशा व्यक्तींशी सुसंवाद करावा. (तरुणांनी पिचकाऱ्या मारीत कट्ट्यावर बसण्यापेक्षा, चन्द्रकिरणात एखाद्या गच्ची वर बसावे, कोजागिरीला पितो तसे दुध प्यावे, अर्थातच याला कोणाच्या घरच्यांचाही विरोध नसेल, नाही का?).  सुगंधी पुष्प , चंदन यांचा वापर करून सुगंध घरात दरवळावा. (आज काल अगरबत्ती किंवा परफ्युम शिवाय सुगंधाचे दुसरे साधन दिसत नाही, फुले फक्त देवा पुरती शिल्लक असल्याचे चित्र आहे.) 

रात्री १० ते ११ वा. या वेळेत झोपी जावे. लहान मुलांना त्यापेक्षा आधी म्हणजे ९ ते १० वा. या वेळेत झोपेची सवय करावी.

झोपेच्या वेळी भारतीय सुगम संगीत ऐकावे. (Indian Classical Music). हे मौज म्हणून नव्हे, तर याने मानसिक ताण कमी होण्यास खूप मदत होते, झोपेची तक्रार असणाऱ्यांसाठी तर हे खूपच उपयुक्त आहे. ( डोळे ताणून ते टीवी वरचे सासू सुनांच्या भांडणाचे , कट कारस्थानाचे सिरियल्स बघण्यापेक्षा  तरी हे नक्कीच बरे, नाही का?) 

झोपण्यापूर्वी तळ पायाला थोडे खोबरेल तेल चोळावे व मग झोपी जावे, याने डोळ्यांना पोषण मिळते, पायांचा थकवा कमी होतो, शांत झोप लागते, तळव्याची त्वचा मऊ होते.

औषध :

सकाळी उपाशीपोटी – १ चमचा गुलकंद किंवा मोर आवळा खावे, पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी, पण कफाचा त्रास नसेल अशांनी.

कफ व पित्ताचा त्रास, मधुमेह असणाऱ्यांनी च्यवनप्राश किंवा मध मिसळून आवळा चूर्ण खावे. 

कामदुधा वटी (मौक्तिक युक्त ) – १ गोळी सकाळी १० वा. व १ गोळी दुपारी २ वा. खावी.

गुडूच्यादी चूर्ण – १/२ चमचा जेवणानंतर दुपारी व रात्री खावे.

_________________________________________________________________

सण , रेसिपी , आयुर्वेदीय अर्थ  :

कोजागिरी पौर्णिमा व दुध : आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करतो, ती फक्त एके दिवशी रात्री दुध पिण्यासाठी  म्हणून नव्हे , तर कोजागिरी पासून शरद  ऋतुस सुरुवात होते (हा भाग वेगळा कि आज काल  ऋतु आपली कूस कशी वाट्टेल तशी बदलतोय, पण त्याला जबाबदार आम्हीच, असो,) आणि कोणत्याही गोष्टीची उत्सवाने सुरुवात करावी म्हणजे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते व अनुसरीली जाते म्हणून आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करतो. म्हणजे ते कोजागिरी पौर्णिमेला सुरु करावे व पूर्ण शरद ऋतूत करत रहावे. शरदाचे चांदणे दुधात पाहत ते दुध त्या चन्द्रकीरनांनी शीतल करावे (फ्रीज मध्ये ठेऊन नव्हे ओ) साखरेने ते मधुर करावे, प्रिया जणांचा सहवास, मनाला विलक्षण आनंद देतो म्हणून सर्व प्रियजानांनी एकत्र येऊन ते प्यावे, याने सामाजिक स्नेह सुद्धा जपला जातो. 

दुध बनविण्यची पद्धत – शक्यतो गायीचे किंवा म्हशीचे दुध घ्यावे, ताजे दुध घ्यावे. (पास्चराइज्ड नसावे). त्यात खारीक, बदाम, वेलदोडे, यांची पौडर मिसळून उकळावे व वरून शतावरी कल्प व साखर मिसळून ते विरघळावे. हे दुध रात्री चांदण्यात ठेवावे, थंड होऊ द्यावे व नंतर प्यावे.

आयुर्वेदात पाण्याला चन्द्रकीरणात थंड करून प्यायचा सल्ला आहे, त्याही पुढे जाऊन त्याच पद्धतीने आपण कोजागिरीला दुध पितो. चान्द्रकीरणात थंड केलेल्या पाण्याला हन्सोदक म्हणतात, तर दुधाला हंसदुग्ध म्हणायला हरकत नाही असे मला वाटते.    
____________________________________________________________________________________________________________________________________________ 

    धन्यवाद.                                                     

डॉ. अमोल पाटील

एम. डी. (आयु – पंचकर्म)