संधीवात - उपचार , समज - गैरसमज  - Tapasya

संधीवात – उपचार , समज – गैरसमज 

संधीवात – उपचार , समज – गैरसमज 

संधिवात किंवा  सांधे दुखी याबद्दल आपण बरेचदा ऐकलेले, बघितलेले किंबहुना अनुभवलेले असते. सांध्यांच्या कोणत्याही विकारांना संधिवात म्हणायचा प्रघात सामान्यांमध्ये आहे. सांध्यांच्या विकारांबाद्दाल आयुर्वेदात (आयुर्वेदाच्या मूळ ग्रंथांत ) काय सांगितले आहे, त्याचे प्रकार कोणते, त्याची करणे कोणती , त्याचे  योग्य  निदान कसे केले जाते, त्याची उपचार पद्धती कशी असायला हवी, याबद्दलची वास्तवता मांडण्याचा हा खटाटोप.

सांध्यांचे विकार  म्हणून आयुर्वेदाच्या मूळ ग्रंथांमध्ये प्रामुख्याने दोन व्याधींचा सविस्तर उल्लेख आढळतो.  एक “संधीगत वात” आणि दुसरा “वातरक्त “.

प्रथम ‘संधीगतवाता’ बद्दल पाहू –  संधिगत वात या विकारात सांध्यांची हालचाल करताना, विशेषतः बसता उठताना, पायऱ्या चढता उतरताना, चालताना सांध्यांमध्ये दुखणे. विशेषतः गुडघे, घोटे दुखणे. सांध्यांमध्ये कटकट आवाज येणे, सांध्यांना सूज येणे हि लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात. संधिगत वात हा विकार विशेषतः मोठ्या सांध्यांमध्ये होतो, मणक्यांच्या सांध्यांमध्ये होतो आणि विशेष करून हा विकार उतारवयात होतो. पाश्चात्य वैद्यक शास्त्रात (अलोपेथी) याला ऑस्टीओआर्थ्रायटिस असे म्हणतात. 
सांध्यांच्या अति वापरामुळे, अतिश्रमामुळे, लट्ठ पणामुळे, अशक्तपणामुळे, मांस व चरबीचे प्रमाण खूप कमी झाल्यामुळे, अति तिखट खाणे, वातूळ आहार सेवन अधिक प्रमाणात करणे, अति मसालेदार खाणें, वाहनाने अति प्रवास करणे,  वेळेवर भोजन न करणे, दुध व तूप यांचे अजिबात सेवन न करणे, या सारख्या अनेक कारणांमुळे सांध्यांमधील पोकळी कमी होऊन , त्यातील स्निग्धता कमी होते, सांध्यांच्या कुर्चा झिजतात, व ते एकमेकांवर घासू लागतात.
  या कारणांमुळे एकीकडे शरीरातील वात वाढतो व हा वाढलेला वात सांध्यांमध्ये वास्तव करतो, तेथील स्निग्धता कमी करून सांध्यात कोरडेपणा उत्पन्न करतो, तर दुसऱ्या  बाजूने  हाडे आधीच कमकुवत झालेली असल्यामुळे एकमेकांवर घासू लागतात व कुर्च्या झीजु लागतात, याला जर पित्ताची जोड मिळाली तर सांध्यांत  उष्णता निर्माण होते, सूज येतो, ठणका वाढतो आणि जर कफाची जोड मिळाली तर सांधे जखडायला लागतात. अशा प्रकारे या विकाराचा प्रवास सुरु असतो.

     या व्याधीमद्धे हाडांचे योग्य प्रकारे पोषण करणे सांध्यांतील स्निग्धता वाढवणे, सांध्यांची झीज थांबवणे हे सर्व एका बाजूला चालू ठेऊन दुसऱ्या बाजूने लट्ठ पणा असल्यास ते कमी करणे, वजन कमी असल्यास ते वाढवणे, म्हणजेच वात कमी करून हाडांना बळकट करणे हे या विकाराच्या उपचाराचे सूत्र आहे. ते कसे करावे – 


१. पंचकर्म – विरेचन, वस्ती, जानुवस्ती, कटीवस्ति इत्यादी क्रिया यासाठी करावी लागतात.
विरेचानाने, वायूचा मार्ग मोकळा होतो शरीरातील अतिरिक्त पित्त कमी होते, चरबी व वजन कमी होते.
वस्ती म्हणजे आयुर्वेदिक एनिमा, यात विविध औषधी काढे, तेल, औषधीसिद्ध दुध, तूप यांचा एनीमा दिला जातो . रुग्ण लट्ठ  आहे कि बारीक यानुसार योग्य त्या औषधांची निवड बस्ती करिता करावी लागते. बस्ती मुळे  वात शरीरातून बाहेर जाऊन, त्याचे शरीरातील प्रमाण कमी होते, वजन कमी करणे किंवा वाढविणे हे करता येते. बस्ती मुळे  हाडांचे योग्य पोषण व्हायला सुरुवात होते. वाताच्या विकारांवर वस्ती हा श्रेष्ठ उपचार आहे. व्याधीच्या तीव्रतेनुसार वस्ती ८ , १५, २१ किंवा ३० दिवस वस्ती करावी लागते.  
जानुवास्ती / कटी वस्ती / ग्रीवावस्ती – जीर्ण झालेल्या सांध्यावर आळे करून त्यात औषधी तेल सोडणे , या क्रियेला जानुवास्ती / कटी वस्ती / ग्रीवा वस्ती असे म्हणतात. हे सांध्यांना पोषण व स्निग्धता देणारे उपचार आहेत. पोडीकिळी, एलक्किळी, नवरकिळी यासारखे उपचार सुद्धा सांध्यांना बाहेरून पोषण देऊन त्यातील वाताचे प्रमाण कमी करण्याचे कार्य करतात. यात विविध औषधी चूर्ण, वनस्पतींची पाने अथवा साठीच्या तांदळाचा विशिष्ठ भात यांची पोट्टली बनवून त्याने सांध्यांना मालिश व शेक दिला जातो.
रक्त मोक्षण – जर सांध्यामध्ये उष्णता खूप वाढून रक्त दुषित झाले असेल तर तेथील रक्त सुईच्या सहाय्याने अथवा जळु लाऊन काढणे आवश्यक असते.
अशाप्रकारे चोहूबाजूंनी वाताला नियंत्रणात आणून इतर सहाय्यक तक्रारींचा उपचार करणे यातून साधले जाते. 


२. आहार विहार  – पंचकर्मा बरोबरच योग्य आहार, विहार व व्यायामाची जोड देणे आयुर्वेदाच्या मते कोणत्याही व्याधीच्या उपचाराचा महत्वाचा भाग आहे. आपल्या आहारात काय असावे , काय असू नये याचा विचार होणे खूप आवश्यक असते. त्याच बरोबर आपली जीवनशैली कशी असावी , जेवणाच्या वेळा , झोप , व्यायाम, योगासने या सर्वांचा योग्य मेळ  घालणे आवश्यक असते. जेणेकरून कोणत्याही कारणांनी वात वाढू न देत हाडांना योग्य पोषण मिळावे व ज्या कारणांनी हा विकार बळावत आहे ते रोखले जातात.


३. औषधे – पंचकर्म, आहार, विहार यांच्या बरोबर काही आयुर्वेदीय औषधे तूप, तेल, काढे, गोळ्या, गुग्गुलू, यांची जोड उपचाराला द्यावी लागते.
तज्ञांच्या मार्गदर्शनाने अशाप्रकारे संधीगातवाताचा उपचार केल्यास, विना साइड इफेक्ट नक्किच हा व्याधी बरा होतो, यात शंका नाही.

आता वळु सांध्यांच्या दुसऱ्या व अधिक महत्वाच्या प्रकारच्या व्याधीकडे ज्याला म्हणतात “वातरक्त”. हे जरा काळजीपूर्वक समजून घ्या, कारण या व्याधीची योग्य माहिती असणे खूप गरजेचे आहे, कारण या बद्दलच अनेक गैरसमजुती लोकांत असलेल्या आढळतात. आधुनिक वैद्यक शास्त्रात नमूद केलेले हृम्याटोइड़ आर्थ्रायटीस, गाऊट, रीयाक्टीव आर्थ्रायटीस सारखे inflammatory joint disorders हे आयुर्वेदात वातरक्त या नावाने ओळखले जाते.

याची अनेक कारणे आयुर्वेदात वर्णिली आहेत, लहानपणापासून अशक्त प्रकृती असणे, तब्बेतीने नाजूक असणे, अति तिखट, मसालेदार आहार खाणे, शक्तीपेक्षा जास्त  काम करणे, अतिश्रम करणे, अति उष्णवातावरणात, उन्हात, पावसात काम करणे, अजिबात व्यायाम न करणे, बैठे काम करणे, दोन चाकी वाहनावरून अति प्रवास करणे, अति थंड पदार्थांचे सेवन करणे, तळलेले पदार्थ वारंवार खाणे, धूमपान , मद्यपान करणे, आधीचे अन्न पचायच्या आधीच दुसरे अन्न खाणे, नेहमी दही खाणे, जेवणानंतर लगेच कष्टाची शारीरिक कामे करणे अथवा व्यायाम करणे, (अलीकडे जिम मध्ये घाम गाळायला वेळ काळ बघितले जात नाही, फक्त सवडीचा विचार केला जातो, पण ते काही योग्य नाही योग्य वेळेत व्यायाम करणे गरजेचे असते, आपल्याला वेळ नाही म्हणून चुकीच्या वेळी व्यायाम केल्यास त्याचा फायदा व्हायच्या ऐवजी तोटाच होतो.) पित्ताच्या इतर विकारांचा त्रास असणे, शौचाला साफ न होणे, विरुद्धाहार खाणे, उदा. दुध केळी एकत्र खाणे,दुध मासे एकत्र खाणे, दुपारी जेवणा नंतर नियमित झोपणे, दुध, तूप अजिबात न खाणे, मार लागणे, कवीळ, टायफोइड, मलेरिया, चिकुन गुण्या सारखे विकारांचा मुळासकट योग्य उपचार न होणे. इत्यादी अनेक कारणांनी  वातरक्त हा विकार होतो.

वरील अनेक कारणांनी एकीकडे रक्तातील उष्णता वाढते तर दुसरीकडे वाताचे शरीरातील प्रमाण वाढते. वाढलेला वात जेव्हा सर्व शरीरात  पसरतो व सांध्यांच्या ठिकाणी जातो तेव्हा आधीच उष्ण गुणाने वाढलेल्या रक्तामुळे आणि सांध्यांच्या वक्रतेमुळे तेथे वाताला अडथळा निर्माण होतो, त्यामुळे वात तेथे थांबतो व वेदना उत्पन्न करायला सुरुवात करतो. अशावेळी जर त्या वाताला स्थानिक पित्ताची जोड मिळाली तर सांधे गरम होतात, आग होते व कफाची जोड मिळाली तर अंगाला, सांध्याला खाज सुटते, सांधे ओलसर होतात, वेदनेपेक्षा सांधे जखडण्याचे प्रमाण जास्त असते, सांधे थंड होतात. हा विकार कोणत्याही वयात होतो, पण प्रामुख्याने तारुण्यात, कुमार वयात याची सुरुवात होते.

हातापायांच्या बोटांपासून खांदे गुडघे, कोपरे, घोटे, कंबर पाठ, मान अशा अनेक सांध्यांमध्ये वेदना होतात कधी कधी एका सांध्यात वेदना थांबतात तर दुसऱ्या सांध्यात सुरु होतात. ठणका भयानक असतो. वेदना सतत होत असतात, त्याला हालचालीची गरज नसते. चैन पडत नाही, झोप  लागत नाही, बराच वेळ एका स्थितीत बसल्यावर किंवा सकाळी झोपून उठल्यावर सांधे प्रचंड जखडतात , सांधे गरम होतात, मधून मधून ताप येतो , बऱ्याच रुग्णांना शौचाला साफ होत नाही, अंग जड होते, अंग दुखते, जिभेला चव लागत नाही, वारंवार तहान लागते, कोरड पडते, आळस येतो, अपचन होते, सांध्यांना सूज येते.  काही रुग्णांना थंडीच्या दिवसात, पावसाळ्यात, आभाळ  झाल्यावर दुखणे वाढते. तर काही रुग्णांना उन्हाळ्यात व सप्टेंबर, ऑक्टोबर या ऋतुत वेदना वाढतात. व्याधी जीर्ण झाल्यास (बराच काळ लोटल्यास) तो हाडांत व मज्जेत मुरतो व त्यामुळे सांधे वाकडे होतात. अशी लक्षणे या व्याधीत दिसतात.

या व्याधीचा उपचार कसा केला जातो ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ – कोणत्याही व्याधीचा उपचार म्हणजे शरीरात झालेला बिघाड दुरुस्त करणे, व पुनः व्याधी होऊ नये म्हणून शरीर अधिकाधिक सक्षम करणे. आता या व्याधी बद्दल त्याच प्रकारे पाहू. रक्ताची उष्णता वाढून रक्त वाढते व त्याचा अडथळा वाताला होतो व वाताचा मार्ग अडवला जातो व त्यामुळे हा व्याधी होतो. हा व्याधी होण्याला कारणीभूत मूळ बाब म्हणजे शरीरात वाढलेला वात व रक्त. म्हणून प्रथम वाढलेल्या रक्ताचा अडथळा दूर करणे व वाताचा मार्ग मोकळा करणे त्याच बरोबर वाताचे प्रमाण कमी करून त्यावर नियंत्रण  हे या व्याधीच्या उपचाराचे सूत्र आहे. ते कसे करायचे असते ते पहा –


रक्तमोक्षण – म्हणजे सुई किंवा जळवांच्या सहाय्याने सांध्यांतून रक्त काढणे. जर रुग्ण अशक्त असल्यास प्रथम त्याचे अग्निबळ वाढवून  शक्ती वाढवून  नंतर रक्तमोक्षण करावे लागते. एकावेळी जास्त रक्त काढू शकत नसल्याने अनेक वेळा थोडे थोडे रक्त काढायचे असते. त्यानंतर वेदना बहुतांशी शांत होतात. पण याचा अर्थ व्याधी बारा झाला असे नव्हे. याने तर फक्त व्याधीच्या उपचाराचा पहिला टप्पा पूर्ण होतो. रक्तमोक्षणाने वाताचा मार्ग मोकळा होतो.


 विरेचन – विरेचानाने शरीरातील उष्णता, अतिरिक्त पित्त , बाहेर निघून जाते, वायूचे अनुलोमन होते व पुनः पुनः रक्ताची उष्णता वाढण्याला खीळ बसते.
तिक्तक्षीर वस्ती – म्हणजे कडू, पित्त शामक औषधी द्रव्यांनी सिद्ध अशा दुध व तुपाचा वस्ती  (एनिमा )  देणे. अशा प्रकारच्या वस्तीने रक्ताची उष्णता वाढू न देता, पित्ताचे शमन होऊन वाताचा नयनाट होतो. वस्ती वातासाठी सर्वश्रेष्ठ उपचार आहे. 


बाह्योपचार- विविध प्रकारचे लेप, तेलाची मालिश, परिषेक म्हणजे औषधी दुध, तूप अथवा तेलाची धार सांध्यांवर सोडणे याने वाताचा मार्ग मोकळा होतो.
अशा टप्प्याने हे पंचकर्म उपचार वातरक्तात केल्यास रक्ताचा अडथळा दूर होऊन वातावर नियंत्रण मिळवल्यास व्याधी मुळासकट दूर होतो , यात शंका नाही.
योग्य आहार विहाराची जोड व्याधीच्या उपचाराला गती देते. 


औषधे – रक्ताची उष्णता कमी करणारे विविध औषधी सिद्ध दुध , तुपाचा  व्याधीच्या उपचारात खूप महत्वाचा वाटा असतो.
अशा तर्हेने पद्धतशीर रित्या या व्याधीचे योग्य निदान करून टप्प्या टप्प्याने योग्य उपचार केल्यास या व्याधीचा मुळापासून नयनाट होतो असा आमचा अनुभव आहे.
या व्याधीबद्दल लिहिताना सुरुवातीला मी, हे काळजीपूर्वक वाचा असे म्हणालो त्याचे कारण सांगतो. बहुतांशी वेळेला वातरक्ताचे निदान आमवात असे केले जाते. आमवात हा व्याधी आयुर्वेदाच्या मूळ ग्रंथात वर्णीत केलेला नसून तो नंतरच्या काळात लिहिला गेलेल्या ग्रंथांत आढळतो. परंतु कफज वाताराक्ताची , किंवा पित्तज वातरक्ताची लक्षणे याच्याशी खूप साधर्म्य आढळते. परंतु या व्याधीत कफदोष व रसधातू हे प्रधान घटक व्याधीला कारणीभूत असतात . आम, कफ व रस धातू यांचा उपचार हा पित्त व रक्ताच्या एकदम उलट असतो. म्हणजे रक्त व पित्ताला थंड , कडू औषधे वापरावी लागतात, दुध व तुपाचा  वापर करावा लागतो  तर कफाचा उपचार, उष्ण औषधे, गोमुत्र, विविध आसव अरिष्ट, यांच्या सहाय्याने करावे लागते. आमवतात सांध्यांना शेकणे हा एक प्रधान उपचार क्रम असून, वातरक्तात रक्तमोक्षण हि प्रधान क्रिया आहे. म्हणजे एकंदरीत जर वातरक्ताला आमवाताचा उपचार केल्यास त्याचा पूर्णपणे उलट परिणाम होतो, गुग्गुलांच्या योगाने वेदना काही काळापुरत्या शामातीलाही परंतु , औषधांच्या व उपचारांच्या गुंत्यात रुग्ण नेहमीचा अडकला जातो, कारण त्या व्याधीचे मूळ कधी तोडलेच जात नाही. काही रुग्णांमध्ये त्याचा उलट परिणाम झालेला आढळतो आणि व्याधी बारा व्हायच्या ऐवजी आणखी बळावतो.
म्हणून सांध्यांच्या विकारांचे योग्य निदान होणे आयुर्वेदिय उपचाराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असते. आधुनिक वैद्यक शास्त्रानुसार ते rheumatoid arthritis  आहे किंवा गाउट, हे निश्चित झाले म्हणजे आयुर्वेदाचे निदान झाले असे नसते, त्याचे निदान आयुर्वेदाच्या मूळ सिद्धान्तानुसारच करावे लागते आणि तसे केल्यासच योग्य उपचार केला जाऊ शकतो.  आयुर्वेदिक औषधे  म्हणजे काही  साईड इफेक्ट नसतो  अशा समजुतीमुळे अनेक जण  वैद्यकीय सल्ल्याला महत्व देत नाहीत व कोणीही सांगेल तसे उपचार करतात. पण तसे करणे योग्य नव्हे, औषधाला औषधासारखेच पहा , मग ते आयुर्वेदिक असो वा अलोपथिक. आपण बिपी , शुगर साठी आपल्या मनाने  किंवा कोणीतरी सांगितले  म्हणून औषध घेत नाही,  तसेच अन्य बाबतीतही असावे.  
धन्यवाद .

 डॉ. अमोल पाटील (एम. डी. – आयु.)